निवृत्ती नाईकरे पाटील
एआय विश्वातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टेक जगतात सध्या दोन आघाडीच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांमधील थेट संघर्ष चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, यामध्ये जगाला चॅटजीपीटीची ओळख करून देणारी ‘ओपनएआय’ आणि शक्तिशाली ‘क्लॉड’ मॉडेलची निर्मिती करणारी ‘अँथ्रोपिक’ या दोन्ही दिग्गज कंपन्या आमनेसामने आल्या आहेत. एका एआय मॉडेलचा वापर करून दुसऱ्याची सुरक्षा भेदल्याचे हे प्रकरण समोर आल्याने संपूर्ण सायबर आणि टेक इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.
सायबर संशोधकांनी OpenAI ची मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या अँथ्रोपिकच्या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने चॅटजीपीटीची सुरक्षा भेदली असून, या घटनेमुळे कंपनीच्या सायबर सुरक्षा रचनेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, संशोधकांच्या एका छोट्या गटाने OpenAI च्या एका कर्मचाऱ्याचे अंतर्गत चॅटजीपीटी खाते हॅक केले. या घुसखोरीनंतर संशोधकांना त्या कर्मचाऱ्याच्या खात्यावरील अंतर्गत संदेश आणि गोपनीय डेटा सहज वाचता येत होता. चॅटजीपीटीच्या निर्मात्यांच्याच घरात प्रतिस्पर्धी एआयच्या मदतीने सुरक्षा यंत्रणेला सुरुंग लावण्यात आल्याचे उघड झाल्याने संपूर्ण टेक जगतात खळबळ उडाली आहे.
#Tech #Chatgpt #Openai #MarathiNews









