पूर्वीचाच पुणे -नाशिक रेल्वे सरळ मार्गाने करावा. खोडद येथे भूमिगत बोगदा करा.-कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ.
पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ सरळ मार्गानेच होणार की शिर्डीमागे होणार, हा वाद काही महिन्यांपासून सुरु आहे. हा रेल्वेमार्ग सरळ मार्गानेच होणे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी कसे योग्य आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून होत आहेत. त्यात आता राज्यातील सत्ताधारी महायुतीतील मंत्री छगन भुजबळ यांनीही उडी घेतली आहे. पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा नाशिक, पुणे आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक, कृषी, व्यापारी व दळणवळणाच्या विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीबरोबरच भविष्यातील मालवाहतूक, औद्योगिक विस्तार आणि लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटीचा विचार करून प्रकल्पाचा मार्ग कमीत कमी अंतराचा, सरळ आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असणे आवश्यक असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी डाॅ. अनिल काकोडकर यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. पुण्याजवळील खोडद येथील जीएमआरटी (GMRT) दुर्बिणीवरील संभाव्य परिणामांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. अनिल काकोडकर काम पाहत आहेत. रेल्वे मंत्रालयाकडून प्रस्तावित करण्यात आलेला सुमारे ३३० किमीचा शिर्डीमार्गे लांबलचक मार्ग हा व्यवहार्य नसून, सध्याच्या सुमारे २८६ किमी अंतरापेक्षाही कमी असलेला सिन्नर–संगमनेर–आळेफाटा–नारायणगाव–मंचर–राजगुरुनगर–चाकण हा मूळ २३६ किमी नाशिक-पुणे महारेल मार्ग प्रवासी आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अधिक योग्य असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. खोडद येथील GMRT (Giant Metrewave Radio Telescope) हे देशाच्या वैज्ञानिक क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे. या केंद्राच्या तांत्रिक गरजा आणि वैज्ञानिक कार्याचा पूर्ण आदर राखून रेल्वे प्रकल्पाची आखणी करता येऊ शकते. त्यामुळे GMRT वर रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफेरन्स अथवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा परिणाम होऊ नये, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वे-कम-रोड दुहेरी बोगदा उभारण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशा सूचनाही मंत्री भुजबळ यांनी केल्या आहेत. खोल भूमिगत बोगदा, आवश्यक ठिकाणी कटिंग रिटेनिंग वॉल्स आणि आधुनिक टनेल हूड्स यांसारख्या तांत्रिक उपाययोजनांचा वापर केल्यास GMRTच्या वैज्ञानिक कार्याचे संरक्षण करत सरळ रेल्वे मार्ग विकसित करता येऊ शकतो. त्यामुळे वैज्ञानिक संस्थेचे हित जपत प्रकल्पाच्या मूळ अलाइनमेंटमध्ये अनावश्यक बदल करण्याची गरज भासणार नाही, असा मुद्दा मंत्री छगन भुजबळ यांनी मांडला आहे. पुणे–नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्ग आणि पुणे–नाशिक रेल्वे मार्ग यांचा एकात्मिक विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि भारतीय रेल्वे यांचा संयुक्त कार्यगट (JWG) तातडीने गठीत करण्यात यावा, अशीही सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या आहेत









