दिवाळी आली की स्वयंघोषित पत्रकारांचा उगम:दिवाळी संपली की पत्रकारितेचा वनवास!
पंधरा ते वीस वर्षे काम करणाऱ्या पत्रकारांची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता मात्र पणाला!
पत्रकारितेच्या बाजारात मूल्यांचा लिलाव थांबणार कधी?
पत्रकारिता हे केवळ नाव लावण्याचे, ओळखपत्र गळ्यात अडकवण्याचे किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या दारात उठबस करण्याचे क्षेत्र नाही. पत्रकारिता म्हणजे समाजाप्रती असलेली बांधिलकी, सत्याचा शोध, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि सत्तेला प्रश्न विचारण्याचे नैतिक धैर्य! मात्र आज या पवित्र क्षेत्राची अवस्था पाहिली की, कुणीही यावे अन् पत्रकार व्हावे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते.ज्याला बातमीचा ‘ब’ कळत नाही, पत्रकारितेची मूल्ये माहीत नाहीत, अभ्यास नाही, लेखनाची जाण नाही, त्याच्याही गळ्यात पत्रकाराचे ओळखपत्र दिसू लागले आहे.
राजकीय पुढारी आणि प्रशासकीय अधिकारी पत्रकारांविषयी चांगले मत ठेवत नाहीत, याचे फारसे आश्चर्य वाटत नाही. कारण पत्रकाराने प्रश्न विचारले, अनियमितता उघड केली, सत्तेच्या चुकीच्या निर्णयांवर बोट ठेवले की अनेकांच्या भुवया उंचावतात. मात्र जेव्हा सामान्य नागरिकही पत्रकार म्हणून वावरणाऱ्या व्यक्तीवर टीका करू लागतात, तेव्हा खऱ्या अर्थाने अंतर्मुख व्हावे लागते. कारण जनतेचा पत्रकारितेवरील विश्वास ढासळणे ही केवळ एका व्यक्तीची बदनामी नसून संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रासाठी धोक्याची घंटा आहे.
लोक टीका करतात, ती नेहमीच योग्य असेल असे नाही.पण टीकेमागील कारणांचा शोध घेण्याचे धैर्य पत्रकारांनी दाखविले पाहिजे. प्रत्येक टीकेला विरोधकांचा कट समजून चालणार नाही. आपली भूमिका तपासली पाहिजे. आपले चारित्र्य, तटस्थता आणि पत्रकारितेची नैतिकता जनतेसमोर सिद्ध केली पाहिजे.
दिवाळीपुरते पत्रकार, पण जुन्या जाणत्या पत्रकारांची बदनामी!
दिवाळी जवळ आली की अचानक स्वयंघोषित पत्रकारांचा उगम होतो. ज्यांना वर्षभर पत्रकारितेच्या क्षेत्रात कुठेही पाहिले जात नाही, ते दिवाळीच्या दिवसांत अचानक पत्रकार म्हणून सक्रिय होतात. ओळखपत्रे, भेटीगाठी, शुभेच्छा आणि वेगवेगळ्या अपेक्षांचे जाळे सुरू होते. दिवाळी संपली की हे पत्रकार पुन्हा कुठे गायब होतात, याचा पत्ताही लागत नाही.
या सगळ्या प्रकाराचा सर्वाधिक फटका बसतो तो जुन्या पत्रकारितेच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या पत्रकारांना.ज्यांचे घर बातम्या, वार्तांकन, जाहिरातींचे कष्ट, धावपळ आणि सामाजिक जबाबदारीवर चालते, त्यांना अशा स्वयंघोषित पत्रकारांमुळे अनेकदा संशयाच्या नजरेला सामोरे जावे लागते.एका व्यक्तीच्या चुकीचे ओझे संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राला वाहावे लागते. एखादा व्यक्ती पत्रकारितेच्या नावाखाली गैरवर्तन करतो आणि त्याची किंमत मात्र प्रामाणिक पत्रकाराला मोजावी लागते. ही परिस्थिती बदललीच पाहिजे.
पत्रकार कोण, याची आता ‘टेस्ट’ झालीच पाहिजे!
पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेशासाठी कोणतीही शिस्त, प्रशिक्षण, अभ्यास किंवा नैतिक निकष नसावेत का? पत्रकार कोण, त्याचे पत्रकारितेतील योगदान काय, त्याने किती बातम्या केल्या, किती सामाजिक प्रश्न मांडले, त्याला पत्रकारितेच्या मूलभूत मूल्यांची जाण आहे का, याची पडताळणी झाली पाहिजे.
पत्रकारितेच्या नावाखाली ओळखपत्रांचे वाटप करणाऱ्या संस्था आणि संघटनांनीही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. केवळ सदस्यसंख्या वाढविण्यासाठी कोणालाही पत्रकार म्हणून मान्यता देणे थांबले पाहिजे. पत्रकारितेचे प्रशिक्षण, आचारसंहिता, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि नैतिक जबाबदारी यांना महत्त्व दिले पाहिजे.
अर्थात, पत्रकार होण्यासाठी एखादी पदवी किंवा विशिष्ट प्रमाणपत्रच अनिवार्य असावे, असा संकुचित आग्रह नाही. कारण अनेक उत्कृष्ट पत्रकारांनी अनुभवातून आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र पत्रकारितेच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पारदर्शक आणि विश्वासार्ह पडताळणी व्यवस्था आवश्यक आहे.
पत्रकारितेचे चारित्र्य वाचविण्यासाठी कुणीतरी पुढे आलेच पाहिजे!
पत्रकारिता म्हणजे कुणाच्या दावणीला बांधले जाणे नव्हे. ती कोणत्याही राजकीय पक्षाची जाहिरात यंत्रणा नाही, अधिकाऱ्यांची पाठराखण करणारे व्यासपीठ नाही आणि वैयक्तिक स्वार्थ साधण्याचे साधनही नाही. पत्रकाराची खरी ओळख त्याच्या लेखणीतील निर्भीडपणा आणि भूमिकेतील तटस्थतेतून निर्माण होते.
आज गरज आहे ती पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्याची. पत्रकार संघटनांनी केवळ सत्कार, मेळावे आणि पदवाटप यापलीकडे जाऊन पत्रकारितेची विश्वासार्हता जपण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी. स्वयंघोषित पत्रकारांच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांना विरोध करावा आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या श्रमिक पत्रकारांच्या सन्मानासाठी एकत्र यावे.
कारण पत्रकारिता बदनाम झाली तर तिचा सर्वाधिक तोटा सामान्य जनतेचाच होणार आहे. सत्तेला प्रश्न विचारणारा, अन्यायाला वाचा फोडणारा आणि दुर्बलांचा आवाज बनणारा पत्रकार समाजातून हरवला तर लोकशाहीचा एक महत्त्वाचा स्तंभ कमकुवत होईल.शेवटी एकच प्रश्न आहे. पत्रकारितेचे ओळखपत्र गळ्यात घातल्याने कोणी पत्रकार होत नाही. मग पत्रकार असल्याचा खरा निकष ठरविणार कोण?
पत्रकारितेचा बाजार मांडणाऱ्यांना रोखलेच पाहिजे. कारण पत्रकारिता ही उपजीविकेचे साधन असू शकते. पण ती केवळ उपजीविकेचा धंदा नाही. ती जनतेच्या विश्वासाची जबाबदारी आहे. आणि हा विश्वास टिकविण्याची जबाबदारी सर्वप्रथम पत्रकारांचीच आहे.
पत्रकारितेला ओळखपत्रांची गर्दी नको, तर निर्भीड, अभ्यासू, प्रामाणिक आणि तटस्थ पत्रकारांची गरज आहे.
टीप -निवृत्ती नाईकरे पाटील यांनी 2007 ते 2016 दै. लोकमत व 2016 ते 2022 दै. पुढारी या वर्तमापत्रामध्ये 16 वर्षे ग्रामीण पत्रकार म्हणून काम केले आहे.शिक्षण-एम. ए अर्थशास्र व डिप्लोमा इन जर्नालिझम










